English | मराठी

ग्रंथालया विषयी

श्री गुरु ईश्वर शिवाचार्य महाराज सार्वजनिक वाचनालय वसमतनगर, जि. हिंगोली "सृजनशील साहसांना सीमा नसतात." हे ब्रीद घेऊन आमचे वाचनालय वसमत व परिसरातील वाचनप्रेमी, जिज्ञासू, ज्ञानपिपासू, लोकांची वैचारिक व व्यक्तीमत्व संपन्नातेची भूक भागवत आहे. मानवी जीवनात ग्रंथाचे, त्यातील विचारांचे महत्व अनन्यसाधारण असते. हे पुढील काव्यपंक्तीतून अधोरेखित होते.

"शब्द आणि दिवे | एक अतूट ऋणानुबंध | एक अतूट नातं | दिव्यासामोर उजळून निघतात.शब्द | अन.... शब्दच घडवितात जीवनाचे दिवे | खरं तर.... वाटसरूला आणखी काय असते हवे ....||"

पुस्तकेच माणसाचे आयुष्य उजळून टाकतात. ज्या व्यक्तीकडे ज्ञानाची प्रचंड शक्ती असते, त्याचा पराभव कधीच होत नसतो. 'समाजाने मला काय दिले, यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो' या भूमिकेतून व साहित्य, संस्कृती व माणूस यांचा वाचन क्षेत्राशी असलेला अनुबंध लक्षात घेऊन वसमत येथील एका मित्र परिवाराने श्री गुरु ईश्वर शिवाचार्य महाराज सार्वजनिक वाचनालययाची स्थापना करण्याचा संकल्प केला. त्या घटनेला आज १७ वर्ष पूर्ण होत आहेत. आज असंख्य वाचक, संशोधक यांना या ग्रंथालयाचा मोठया प्रमाणात उपयोग होत आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.

ग्रंथालयाची स्थापना व प्रेरणेविषयी

प्रेरणा मिळाली कि माणूस विधायक कामास अधिक गतीने सुरुवात करतो. प्रेरणारुपी आशीर्वादा मुळे आत्मिक बळ व उर्जा निर्माण होते. लासिन मठ संस्थान वसमत जि. हिंगोलीचे तत्कालीन मठाधिश सदगुरु ष. ब्र. प १०८ ईश्वर शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वाद आणि प्रेरणेने या वाचनालयाची कोनशिला दि. २१ फेब्रुवारी १९९६ रोजी कोरली गेली. ग्रंथालयास १९९७-९८ ला शासन मान्यता मिळाली असून नोंदणी क्र. एफ २५९५ (परभणी) असा आहे. ग्रंथालयास ‘ब’ दर्जा प्राप्त झालेला आहे. महाराजांनी या कामी दिलेली प्रेरणा व सहकार्य वाचनालय स्थापणेच्यादृष्टीने अतिशय महत्वपूर्ण घटना आहे.

सदगुरु ष. ब्र. प १०८ ईश्वर शिवाचार्य महाराज यांचा जन्म कर्नाटकातील चिकोडी या गावी १५ ऑगस्ट १९२३ रोजी एका सुसंस्कृत कुटुंबात झाला. त्यांचे बालपणी चे नाव गुरुमूर्ती असे होते. अध्यात्मिक विधेचे माहेर घर असलेल्या बनारस येथे राहून गुरुमुर्तिनी अनेक विद्या आत्मसात केल्या. कन्नड या मातृभाषेप्रमाणे हिंदी, मराठी या भाषांवरही त्यांचे प्रभुत्व होते. मराठी भाषा व व्याकरण यांचा विशेष अभ्यास त्यांनी यावल येथील मठात केला.तेथे अनेक धार्मिक ग्रंथाचा अभ्यास केला. वैदिक, अवैदिक इ. तत्वज्ञानाबरोबर आधुनिक पाश्चिमात्य व पौर्वात्य तत्वज्ञान अभ्यासले संस्कृत भाषेच्या ज्ञानामुळे भाषेच्या सौदर्याची विशेष जाण महाराजांना होती.

महाराजांना तत्वज्ञानाबरोबर संतसाहित्याचाही व्यासंग होता. कानडी-मराठी संत परंपरा , त्यांचे कार्य या संबंधीचा अभ्यास त्यांनी केला. त्यांनी मठाच्यावतीने लक्ष्मण महाराज यांच्या अभंगाचे पुस्तक प्रकाशित केले. संत साहित्यातून सामाजिक प्रबोधन घडत असते याची जाणीव महाराजांना होती म्हणूनच अभंगाच्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांनी स्वखर्चाने करून ते समाजार्पण केले. ग्रंथ प्रेम, अध्ययनवृत्ती, सद्विचारांना लोकांपर्यंत पोहोचविण्याची तळमळ, इ. विशेष महाराजांच्या व्यक्तिमत्व होते. त्यांचाच कार्याचा, विचारांचा वारसा चालविण्याचा प्रयत्न आम्ही ग्रंथालयाच्या माध्यमातून करत आहोत. महाराजांच्या सातत्यपूर्ण प्रेरणेतून ग्रंथालय उचित ध्येय बाळगून मार्गक्रमण करीत आहे.

ग्रंथालयाची वाटचाल

श्री गुरु ईश्वर शिवाचार्य महाराज सार्वजनिक वाचनालय हे आज “ईश्वर ग्रंथालय” या नावानेही ओळखले जाते. ग्रंथालयाची कार्यकारिणी व सर्व सदस्य साहित्य, संगीत, चित्र, शिल्प अशा विविध कलागुणांचे अभ्यासक व आस्वादक आहेत. तसेच वाचनालयाशी संबंधित अनेकजण सृजनशील कलावंतही आहेत. याचा उपयोग वाचनालयाचा चेहरा अधिक सुंदर करण्यासाठी झाला आहे. साहित्य, विज्ञान तसेच स्पर्धात्मक परीक्षा तयारीसाठी चे उपयुक्त ग्रंथ एकत्रित करून त्यांचे जतन केले आहे. त्यामुळे अभ्यासक रसिक वाचक यांना आपला व्यासंग वाढविण्यासाठी हे ग्रंथालय कार्य करत आहे. १५० पुस्तक संख्येवर सुरु झालेल्या या ग्रंथालयात आजमितीस १०,००० पेक्षाही भिन्न भाषेतील ग्रंथ उपलब्ध आहेत. ही ग्रंथसंख्या जनसेवेची तळमळ व ग्रंथालयाच्या वैभवशाली वाटचालीची साक्ष देणारी आहे. आज, विज्ञान, तंत्रज्ञान, जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. नवनवीन क्षेत्रात नोकरी, व्यवस्थापनांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासू विध्यार्थ्यांसाठी वाचनालयात वेगळा विभाग चालविला जातो. त्यासाठी आवश्यक त्या पुस्तकांची उपलब्धता व्यवस्थापनामार्फत करून देण्यात आलेली आहे.

८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, व श्री अशोक गाडेकर (स. ग्र. संचालक औरंगाबाद) यांच्या शुभहस्ते व उपस्थितीत दि. ४ मार्च २०१३ रोजी ग्रंथालायात 'ई-ग्रंथालय' संगणक प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाचक व रसिक यांच्या तत्पर सेवेसाठी होत आहे. ग्रंथालयाच्या वर्धापनदिनाचे निमित्य साधून दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात 'व्याख्यानमाला' व 'बालचित्रकला' स्पर्धेचे आयोजन केले जाते. या चित्रकला स्पर्धेत सुमारे २००० विध्यार्थी सहभागी होतात. ही स्पर्धा वाचनालयाची वेगळी ओळख ठरली आहे. यशस्वी स्पर्धकांना महाराष्ट्रातील लौकिकप्राप्त व्यक्तीच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात येते.

व्याख्यानमालेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, कवी, चित्रकार, विचारवंत, शिक्षणतज्ञ इत्यादींचा विचारस्पर्श वसमतनगरीला झाला आहे. याचा ग्रंथालय व्यवस्थापनास अभिमान आहे. यामध्ये प्रामुख्याने -  मा. गंगाप्रसादजी अग्रवाल,  न्या. नरेंद्र चपळगावकर, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. विठ्ठल वाघ, प्रा. फ. मु. शिंदे,  डॉ. लक्ष्मन देशपांडे,  मा. भ. मा. परसवाळे, प्रा. इंद्रजित भालेराव, प्रा. प्रकाश मेदककर, मा. सुधाकर डोईफोडे, प्राध्यापक लक्ष्मिकांत तांबोळी, प्रा. जे. एम. मंत्री, प्रा. जयराम खेडेकर, प्रा. प्रकाश कामतीकर, प्रा. सुभाष वसेकर,  मा. का. म. शेजूळ (ग्रंथालय संचालक महा. राज्य ), मा. मा. सो. कांबळे, मा. अशोक गाडेकर ( सहा.ग्रंथालय संचालक, औरंगाबाद ), मा. रविचंद्र हडसनकर, डॉ. नागनाथ पाटील, मा. शशिकांत मेढेकर, प्रा. जगदीश कदम, प्रा. शफी शेख, प्रा. विलास वैध्य, मा. सुधाकर कुलकर्णी, कवयित्री संजीवनी ताडेगावकर, राजू महाजन (चित्रकार) प्रा. यशपाल भिंगे, प्रा. सुभाष खैरे,  प्रा. पृथ्वीराज तौर इत्यादींनी आपले व्यक्ती व समाजोपयोगी मौलिक चिंतन व्यक्त केले आहे.

ईश्वर ग्रंथालयाचे सातत्यपूर्वक विधायक कार्य समाजावर साहित्यिक, सांस्कृतिक, संस्कार, नक्कीच घडवतील याचा ग्रंथालय परिवारास विश्वास आहे. तसेच 'सेवाभाव आणि जनहितात काम करणे ' या परिवारास महत्वाचे वाटते. ग्रंथालयास स्वत:ची इमारत नाही. जनाश्रय जानाधाराशिवाय ही चळवळ अति विशाल रूप घेऊ शकत नाही. तेव्हा समाजातील काही दानशूर व्यक्तींकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आजपर्यंत संवेदनशील वाचक रसिकांनी आमच्यावर उदंड प्रेम केले आहे. तेव्हा त्या सर्वांच्या ऋणातच राहणे आम्हाला अधिक आवडेल.


ठळक बाबी :


  Copywrite 2013 ishwargranthalaya
Design by Uma